नगर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; रेड अलर्ट जारी 

महाराष्ट्र

जनशक्ती (वृत्तसेवा)- गेल्या काही दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतलेल्या मान्सूनने जोरदार कमबॅक केला आहे. नगर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून जिल्ह्यात प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे.  नगर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुढील काही दिवस मान्सूनचा धुमाकूळ कायम राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना ४८ तासांसाठी हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.  नगर, जळगाव, धुळे, पुणे, सातारा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जाेरदार सरी काेसळण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला असून या सर्व जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात आत्तापर्यंत ४७०.२ मिलीमीटर पाऊस झाल्याने नगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमधून माेठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गाेदावरी, भीमा पात्रातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या श्रीगाेंदा, कर्जत, तर गाेदावरीकाठच्या काेपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे, पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, नदी अथवा ओढे नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये, पूर पाहण्याासाठी गर्दी करु नये, जुनाट, मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये, घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे, धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, आपत्कालिन परिस्थितीमध्ये १०७७ या टाेल फ्रीवर संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.