बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे दसरा सणानिमित्त आयोजित श्री बालाजी पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. बालाजी यात्रा उत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली असून यामध्ये दररोज नामांकित महाराजांची कीर्तने होत असून विजयादशमी (दसरा) निमित्त हभप गाथामूर्ती सुखदेव महाराज मुंगसे यांची कीर्तन सेवा पार पडली. किर्तन सेवेनंतर श्री बालाजी पालखी मिरवणूक सोहळा पार पडला. यामध्ये श्री बालाजी पालखीची गावातून फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी पारंपारिक गज ढोल, गजनृत्य या वाद्यात तसेच अहिल्याबाई होळकर शाळेतील लेझीम पथक, जय भवानी युवा ग्रुप, ओन्ली साई ग्रुप यांच्या विविध प्रकारच्या लेझीम पथकाने सोहळ्याची शोभा वाढवली.
या पालखी मिरवणुकीत भजनी मंडळाने रात्रभर हरिनामाच्या गजरात वेगवेगळ्या प्रकारची भजने गवळणी व भक्ती गीते सादर करून गावात व परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण केले.श्री बालाजी पालखी मिरवणूक गावातील भाविकांच्या दारासमोर येत असल्याने गावभर प्रत्येकाच्या दारासमोर सडा, रांगोळी व विविध प्रकारची सजावट केली होती.
यावेळी भाविकांनी श्री बालाजीच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी बालाजी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ यांनी आपला सहभाग नोंदवून विशेष परिश्रम घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.