जनशक्ती (वृत्तसेवा)- आम्हाला खोके नको आहेत, आम्हाला आमच्या जिवाभावाची अस्सल मर्दासारखे लढणारे बांधव, माता भगिनी पाहिजे, हिच तर आमचे संपत्ती आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. नेवासा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ नेवासा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, खरंच मला शंकरराव तुमचा अभिमान आहे. माझ्याकडे तर काहीच नाही, मी तुम्हाला काय देऊ शकतो, अद्याप माझ्याकडे काही नाही, द्यायचं की नाही ते जनता ठरवणार आहे. त्यांनी दिले तर मी तुम्हाला देणार आहे. आता तर माझे हात रिकामे आहेत. तरी तुम्ही माझ्यासोबत राहिलात. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास शंकररावांना न मागता मंत्रीपद दिल जाईल, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. उद्धवजी ठाकरे यांच्या या सभेला उच्चांकी गर्दीची नोंद झाली.”गडाख साहेब तूम आगे बढो”, हम तुम्हारे साथ है”, उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है”अशा घोषणांनी नेवासा परिसर दुमदुमला होता.
आपल्या मुख्य भाषणात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, यशवंतराव गडाखांसारख्या जेष्ठांचा मिळालेला आशीर्वाद व जनतेची साथ सोबत हेच माझे भांडवल आहे. शिवसेना फोडणाऱ्यांनी माझा पक्ष व चिन्ह चोरले, मी संपलो असे त्यांना वाटले. परंतु माझा उद्धार करण्यासाठी मोदी व शहा यांना महाराष्ट्रात यावे लागते, आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, आमच्यात लाचारी नाही, माझ्याशी एकनिष्ठ राहून साथ देणाऱ्या शंकरराव गडाख यांना तुमच्याबद्दल अभिमान असल्याचे सांगत आयुष्यात मी शंकरराव गडाखांना कधीच अंतर देणार नाही, उद्या मी काय देणार हे मागण्याची आपल्याला गरज पडणार नाही, अशी ग्वाही सर्वांच्या समोर देत त्यांनी तालुक्याच्या भवितव्यासाठी शंकरराव गडाख यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलतांना ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले, आमदार शंकरराव गडाख यांनी मंजूर करून आणलेले विकासकामे व योजना बंद करण्याचे पाप भाजप सरकारने केले. आम्ही डगमगलो नाही, महाराष्ट्राच्या भल्यासाठी उद्धव साहेब तुम्हालाच मुख्यमंत्री झाले पाहिजे. कारण आपल्या हातात महाराष्ट्र सुरक्षित राहील, असा विश्वास व्यक्त करत शंकररावांना आता आपल्या ओटीमध्ये टाकले आहे, त्याला जपा, अशी आर्त साथ त्यांनी उध्दव ठाकरे यांना घातली.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, अनेक सभा मी पाहिल्या, मात्र आजच्या सभेतील गर्दीचा करंट मला वेगळाच दिसतो. त्यामुळे लाखांच्या फरकाने गडाख साहेबांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख साहेबांनी संघर्ष करत विकासाची वाटचाल सुरू केली. त्यांच्याच मुशीत तयार झालेले व्यक्तिमत्त्व व आदर्श लोकप्रतिनिधी शंकरराव गडाख असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले. आमदार शंकरराव गडाख म्हणाले, मागील वर्षी अपक्ष असतानाही तालुक्यातील जनतेने निवडून दिले. मी उध्दव साहेबांच्या सरकारला पाठिंबा दिला. मनातही नसतांना मला उद्धव ठाकरे साहेबांनी मंत्रिपद दिले. मंत्रिपदाचा उपयोग तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी केला. दीड वर्षात नेवासा तालुक्याचा चेहरामोहरा बदलला. मात्र, सत्ता गेल्यानंतर महायुती सरकारच्या काळात नेवासा तालुक्याला निधी दिला गेला नाही. राजकीय हेतूने या सरकाने विकासकामांना स्टे लावला, इतरांनी मात्र हिंदू मुस्लिम वाद करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मी नेवासा शहरातील हिंदू मुस्लिमांना एकत्रित करण्याचे काम केले. त्यामुळे एकोपा निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. हा जनता जनार्धनाचा जनसागर मला पाठिंबा द्यायला आला आहे. नेवासा तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी मला साथ द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे,माजी आमदार पांडुरंग अभंग, उदयन गडाख, अशोक गायकवाड,अनिल मते, अँड.सतीश पालवे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा लताताई डांगे यांनी आपल्या भाषणातून आमदार शंकरराव गडाख यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. सभेच्या प्रारंभी दुपारी बारा वाजल्यापासूनच उद्धव ठाकरे यांच्या सभेला नेवासा येथील नामदेवनगर मधील मैदानात नागरिकांनी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या सभेने गर्दीचा उच्चांक मोडल्याची चर्चा सभा सुटल्यानंतर मतदारांमध्ये होती. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी गळ्यात मशालीचे भगवे उपरणे परिधान करून व झेंडे फडकावित सभेसाठी मोटार सायकल रॅली काढली होती. नामदेवनगरचे प्रांगण गर्दीने फुलून गेले होते.यावेळी झालेल्या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख होते.
तर शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेनेचे उमेदवार आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वासमामा गडाख, भैयासाहेब देशमुख, अशोकराव गायकवाड,जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, दिलीप दळवी, रामदास गोल्हार, अशोक गायकवाड, कम्युनिस्ट पक्षाचे अँड. बन्सी सातपूते, बहुजन समाजाचे युवा नेते संजय सुखदान, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष अँड. सादिक शिलेदार, जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तूभाऊ काळे, महंमदभाई आतार, रामभाऊ जगताप, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा लताताई डांगे, अनिल मते यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
नेवासा तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक तसेच महाविकास आघाडीच्या मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपले झेंडे घेऊन सभेला उपस्थित झाले होते.