महंत भास्करगिरीजी बाबांच्या काल्याच्या किर्तनाने श्री दत्तजयंती महोत्सवाची सांगता

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पीठ येथे श्री दत्तजयंती महोत्सवाची रविवारी (दि.१५) गुरुवर्य महंत भास्करगिरीजी बाबांच्या काल्याच्या किर्तनाने  काल्याची दहीहंडी फोडून स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्यासह संत महंतांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. संत विचाराला व राष्ट्र हिताला कधी ही हुलकावणी देऊ नका, संत वचनाप्रमाणे जीवनात वाटचाल करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनात बोलतांना गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज म्हणाले की संयम ठेऊन मनुष्य जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद संतामध्ये आहे. संत हे कुविचारी माणसांना देखील सदगुणी करतात. तसेच कार्य श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांनी या ठिकाणी केले. भीतीदायक असलेल्या जागेचे नंदनवन केले. श्री दत्त जयंती महोत्सवात योगदान देणाऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी श्री भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रवेशद्वाराजवळ बांधण्यात आलेली काल्याची दहीहंडी फोडण्यात आली. देवस्थानच्या वतीने बजरंग विधाते यांनी सोहळ्यात योगदान देणाऱ्या दात्यांचे, सेवेकरी भाविकांचे व उपस्थित भाविकांचे आभार मानले. यावेळी उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी झालेल्या काल्याच्या किर्तनप्रसंगी संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी गुरुवर्य बाबाजींचे संतपूजन केले. याप्रसंगी रामकृष्ण आश्रमाचे महंत भगवान महाराज जंगले शास्त्री, दिनकर महाराज मते, बाबांच्या मातोश्री श्रीमती सरुबाई पाटील, स्वामींच्या मातोश्री मीराबाई मते, नामदेव महाराज कंधारकर, मारुती महाराज काळे, रामनाथ महाराज पवार, राम महाराज काळे, पंढरीनाथ महाराज मिस्तरी, लक्ष्मण महाराज नांगरे, गणपत महाराज आहेर, रामजी विधाते, रामनाथ महाराज शेळके, अमोल महाराज बोडखे, दादा महाराज साबळे, हरी महाराज भोगे, अतुल महाराज आदमने, संतोष महाराज चौधरी, बाळू महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे, शुभम महाराज बनकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.