जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून येत्या 20 डिसेंबर रोजी मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रयत्नातून व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुळा पटबंधारे विभागाच्या अधिकारी यांच्या समवेत बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सध्या नागपूर अधिवेशन चालू असतात त्या दरम्यान ही बैठक पाट पाण्यासंदर्भात घेण्यात आली. या बैठकीमध्ये पाट पाण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये मुळा पाटबंधारे विभागाच्या वतीने येत्या 20 तारखेला शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार विठ्ठलराव लंघे यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द दिला होता. तोच शब्द पाळत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी नागपूर येथे अधिवेशन दरम्यान पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन येत्या 20 तारखेला शेतकऱ्यांसाठी पाटपाण्याचे आवर्तन सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यातून सध्या लागवड होत असलेला ऊस तसेच पेरणी होत असलेल्या गहू, हरभरा पिकांसाठी मोठा दिलासा या पाटपाण्याच्या माध्यमातून मिळणार आहे.
या बैठकीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे, पाटबंधारे विभागाच्या अधिकारी सायली पाटील आदी उपस्थित होते.
