राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत कांस्यपदक पटकवणाऱ्या वैष्णवी शरद काळेचा भव्य नागरी सन्मान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत कांस्यपदक पटकवणारी तेलकुडगावची सुकन्या वैष्णवी शरद काळेचा समस्त ग्रामस्थ तेलकुडगांवच्या वतीने भव्यदिव्य मिरवणूक काढून नागरी सन्मान करण्यात आला.
हरिद्वार (उत्तराखंड) या ठिकाणी झालेल्या ५० व्या कुमार/कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्या बहारदार चढाईच्या जोरावर महाराष्ट्र राज्याला कांस्यपदक मिळवुन दिल्याबद्दल, आणि राष्ट्रीय खेळाडू शिवम पटारे प्रो कबड्डी हरियाणा स्टीलर्स विजेता याचा देखील भव्यदिव्य डीजे, सनई वाद्य, फटाक्यांची आतषबाजी, करत, नागरी सत्कार समारंभ आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबरावजी घाडगे पाटील साहेब (संस्थापक – त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान.) होते.
त्रिवेणीश्वर देवस्थानचे मंहत रमेशानंदजी गिरी महाराज,
विजयसिंह मिस्कीन सर (सह-सेक्रेटरी – जिल्हा आसोसिएशन अहिल्यानगर)
शिवम पटारे (राष्ट्रीय खेळाडू प्रो कबड्डी हरियाणा स्टिलर्स विजेता), मोढवे सर (जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ) माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील, प्राचार्य सोपानराव काळे सर, प्राचार्य गायकवाड सर, प्राचार्य दुधाडे सर, शंतनु पांडव सर, अनिल पठारे सर, प्रा.सचिन कर्डिले सर, पाणखडे सर, प्रशांत नाकाडे सर, सुवर्णा लोखंडे व सिद्धार्थ सरोदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्यातील तेलकुडगांवची रणरागिनी वैष्णवीचा जन्म सुरेखा व शरद उत्तम काळे यांच्या उदरी मजलेशहर , ता-शेवगाव येथे दि.१५-४-२००६ रोजी एका ग्रामीण शेतकरी व मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. या ग्रामीण जीवनाशी झुंज देत प्राथमिक शिक्षण मामाच्या गावी जि.प.प्रा. शाळा मजलेशहर व त्यानंतर त्रिमुर्ती पब्लिक स्कूल ढोरजळगाव येथे तिचे चुलते रामनाथ काळे सर यांच्या सहवात झाले.
त्यानंतर पाचवी ते नववी पर्यंतचे शिक्षण कै.हरिभाऊ आनंदराव घाडगे पाटील माध्यमिक विद्यालय तेलकुडगाव येथे झाले व शिक्षण घेत असतानाच इयत्ता – ७ वी मध्ये असताना आबासाहेब घाडगे सर यांच्या नेतृत्वाखाली १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघात खेळत तीने आकर्षक खेळ करत जिल्हा स्तरापर्यंत मजल मारली व तालुक्यात आपला दबदबा निर्माण केला. तेव्हांपासूनच कबड्डीचे आकर्षण अधिक तिव्र झाले . अभ्यासातही हुशार असल्यामुळे कबड्डी खेळ तिने लवकरच आत्मसात केला आणि कबड्डी स्पर्धेतील यशस्वी कारकीर्दीची सुरुवात झाली. पण शहरी भागातील मुलींशी स्पर्धा करायची म्हणजे शारिरीक कसरत व योग्य वातावरणाची गरज लागणार म्हणून पुढील शिक्षण व खेळाचे धडे गिरवण्यासाठी मा. मेजर साहेबराजी घाडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले महाराष्ट्रातील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल नेवासा फाटा येथे दाखल होऊन दहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
वैष्णवी अभ्यास, खेळ, वक्तृत्व मध्ये अतिशय हुशार असल्यामुळे खेळाबरोबर तिने सन – 2021-22 मध्ये SSC बोर्ड परीक्षेत 82.80% गुण व सन -2023-24 मध्ये HSC बोर्ड परीक्षेत 83.30% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले . याच ठिकाणी तिने आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देत कबड्डीकडे ओढ घेतली. प्रा. सोपनराव काळे सर व प्रशिक्षक अशोकराव पानखडे सर यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील असल्यामुळे तिला शहरी मुलींविरोधात खेळायचे म्हटले की भीती वाटायची, परंतु आद. संस्थापक साहेबाच्या प्रेरणेने व आपल्या मार्गदर्शकाच्या विश्वासावर तिने व तिच्या संघाने शालेय स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात 2022 मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावत ‘आकाशालाच गवसनी घातली.’ व आपल्या गावाचे, शाळेचे, संस्थेचे , तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे नाव राज्यात गाजवले. त्यानंतर शालेय स्पर्धेत 19 वर्षे वयोगटात 2023 मध्ये देखील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत देखील प्रथम क्रमांक मिळवला परंतु काही कारणास्तव राष्ट्रीय स्पर्धा झाल्या नाही. तर 2024 मध्ये ती 19 वर्षे वयोगटात राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळली . त्याच वर्षी तिला ‘ खेलो इंडिया व कुमार गट ‘ या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी तिने खूप कष्ट घेतले. परंतु तिच्या नशिबात नव्हतेच म्हणा किंवा मेहनत कमी पडली म्हणा !. ती दोन्हीही स्पर्धा खेळू शकली नाही . त्या वेळेस खूप नाराज झाली . पर ‘ मंजिले उन्हीं को मिलती हैं , जिनके सपनो में जान होती हैं । पंख होने से कुछ नहीं होता , हौसलों से उड़ान होती हैं। ‘ या उक्ति प्रमाणे पुन्हा जिद्दीने पेटून उठली आणि मला अजून खेळायचे आहे असे वडील व अजी -आजोबा यांच्याकडे हट्ट धरला. वडील व अजी – आजोबांना वाटे आपण अगदी ग्रामीण भागातील रहिवासी , सर्वसामान्य कुटुंबातील , मध्यमवर्गीय , आर्थिक परिस्थिती बेताची आणि आपण वैष्णवीला कुठपर्यंत खेळवणार ! आपण तीच्या इच्छा पूर्ण करू शकू का ? या विचारात असतांना वैष्णवीने सर्वांना विश्वास देत आपल्या कुटुंबाचे मनोबल वाढवण्यात यशस्वी झाली व तिने कुटुंबाला शब्द दिला की, माझ्या राष्ट्रीय स्पर्धेच्या सिलेक्शन ‘ साठी वडिलांना व संपूर्ण कुंटुबाला कुठलाही त्रास होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईल, असा विश्वास देत तिने पुन्हा जिद्दीने सुरुवात केली. वर्षभर कठीण मेहनत व अतोनात कष्ट करायला सुरुवात अशोकराव पानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली . राष्ट्रीय कबड्डी खेळाडू वैष्णवी हिचे अपार कष्ट म्हणजे चार – चार तास वर्कआउट ,सातशे – सातशे सपाट्या , तीन – तीन हजार पायऱ्या मारत व त्याच पद्धतीने आपला आहार देखील सांभाळला. ही अपार मेहनत घेण्यासाठी तीचे आजोबा उत्तम व आजी भिमाबाई काळे हे खूप प्रोत्साहन देत असे. शेतकरी व एकत्र कुंटूब पद्धती असल्यामुळे तिला संस्काराचे धडे ही वडील , आई , आजी-आजोबा , चुलते , चुलती ,भाऊ ,बहीन यांच्याकडून मिळाले त्यामुळे वैष्णवीत आदर्श गुणांची रुजवण झाली.
तिच्या स्पर्धा कुठे असल्या आणि जर लाईव्ह असतील तर कितीही रात्र झालेली असो , शेतात कष्टकरून कितीही थकलेले असो कुंटुबातील सर्व सदस्य तिच्या स्पर्धा बघितल्याशिवाय झोपत नसायचे. म्हणजे ग्रामीण भागाचा , परिस्थितीचा , अशिक्षित पणाचा किंवा मुलींन विषयी संकोचीत पणाचा कोठेही लवलेश न लागू देता संपूर्ण कुंटुब वैष्णवी च्या पाठीशी उभे राहीले आहे . त्याचीच फलश्रुती म्हणजे
तेलकुडगांवची सुकन्या रणरागिनी वैष्णवी शरद काळे हिने उत्तराखंड हरिद्वार येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवुन दिले. या यशाबद्दल अहमदनगर असोसिएशनचे अध्यक्ष खासदार निलेश लंके , सचिव शशिकांत गाडे , सहसचिव विजयसिंह मिस्किन प्रशिक्षक विजय भूतकर , सुधाकर सुंबे , शंतनु पांडव आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी नातेवाईक मध्ये एकनाथ पा.देवढे, देविदास खैरे, काकासाहेब पुंडे, ज्ञानेश्वर नवथर, बाबासाहेब साबळे, ज्ञानेश्वर पिसोटे, सोमनाथ पिसोटे, राजेंद्र ढुस, ताराचंद लोढे, भाजपा तालुकाध्यक्ष शेवगाव ,नितीन देवढे, संतोष भराट ,अण्णासाहेब पिसोटे, ग्रामस्थांमध्ये तेलकुडगांव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, तेलकुडगांव सोसायटी, रेणुकामाता देवस्थान, चैतन्य नागनाथ देवस्थान, हनुमान भजनी मंडळ, हनुमान देवस्थान, जि.प.प्रा शाळा तेलकुडगांव, विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळ, भिमशक्ती युवा प्रतिष्ठान, आदि मान्यवर मंडळी यांच्यावतीने वैष्णवी शरद काळे हिचा नागरी सन्मान करण्यात आला. मान्यवरासह, सूत्रसंचालन गव्हाळ सर यांनी केले. स्वागत गीत भारस्कर सर व गायत्री मरकड यांनी सादर केले. शरदराव काळे उपसरपंच यांनी उपस्थिततांचे आभार मानले.