श्रीरामनवमी उत्‍सवात साईचरणी ४ कोटी २६ लाखांचे दान  

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजीत केलेला श्रीरामनवमी उत्‍सव शनिवार ०५ एप्रिल ते सोमवार ०७ एप्रिल या कालावधीत संपन्‍न झाला. या उत्‍सव कालावधीत एकूण रुपये ०४ कोटी २६ लाख ०७ हजार १८२ इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये रोख स्वरुपात रुपये ०१ कोटी ६७ लाख ८९ हजार ०७८ दक्षिणा पेटीत देणगी प्राप्त झाली असून, देणगी काऊंटरवर ७९ लाख ३८ हजार ८३० रुपये, पी.आर.ओ. सशुल्क पास देणगी ४७ लाख १६ हजार ८००, ऑनलाईन चेक डीडी, मनिऑर्डर, डेबीट क्रेडीट कार्ड, युपीआय याद्वारे ०१ कोटी २४ लाख १५ हजार २१४, सोने ८३.३०० ग्रॅम रक्कम रुपये ०६ लाख १५ हजार ७८२ व चांदी २०३०.४०० ग्रॅम रक्कम रुपये ०१ लाख, ३१ हजार ४७८ यांचा समावेश आहे. श्रीरामनवमी उत्सव कालावधीत साधारणतः अडीच लाखांहून अधिक साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला, उत्सव कालावधीमध्ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे ०१ लाख ६१ हजार ५२९ साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत ०१ लाख ७६ हजार २०० साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले. या कालावधीत ३ लाख ६३ हजार ०७४ लाडूप्रसाद पाकिटांची विक्री झाली असून त्‍या माध्‍यमातून ७२ लाख ६१ हजार ४८० रूपये प्राप्त झाले. उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थानच्या साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवासस्थान, व्दारावती निवासस्थान, साई आश्रम भक्तनिवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरीता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला. तसेच साईधर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला, असे उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी सांगितले.