बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील शहापूर येथे श्री कालभैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रा उत्सवासाठी शहापूरसह जिल्हाभरातील भाविकांनी उपस्थित राहत दर्शन घेतले. या यात्रा उत्सव काळात रविवारी कावडी मिरवणूक, श्री भैरवनाथ मूर्तीस गंगाजल स्नान, आरती व प्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच शोभेची दारू व छबीना मिरवणूक पार पडली. तर सोमवारी हजेरीचा कार्यक्रम व सायंकाळी कुस्त्यांचा जंगी हगामा पार पडला. या हगाम्यासाठी नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांना अनेक चित्तथरारक कुस्त्या बघायला मिळाल्या. या यात्रा उत्सवाच्या यशस्वीतेसाठी समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ, शहापूर यांनी विशेष परिश्रम घेतले.
