तेलकुडगाव येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव ग्रामसचिवालयसमोर १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. तसेच यावेळी काश्मीर पहलगाम मधील हल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पगुच्छ व हार अर्पण करण्यात आले. त्यानंतर काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवरती आंतकवाद्यांनी जो हल्ला केला, त्यामध्ये आपले २६ भारतीय मारले गेले. त्यांना महाराष्ट्रदिनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पहलगाम येथील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत समस्त ग्रामस्थ तेलकुडगाव यांच्या वतीने भारत सरकारने पाकिस्तानला व आंतकवाद्यांना धडा शिकवावा यासाठी खंबीर पाठिंबा देण्यात आला.
१ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन १ मे रोजी साजरा केला जातो. कामगार दिन जगभरातील कामगारांच्या योगदानाचा आणि संघर्षांचा सन्मान करतो . १८८६ च्या हेमार्केट घटनेपासून सुरू झालेला हा दिवस कामगार चळवळीच्या न्याय्य परिस्थिती आणि योग्य वेतनासाठीच्या लढ्याला मान्यता देतो. यावेळी तेलकुडगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सर्व सदस्य, सर्व कर्मचारी वृंद, गावातील विविध संस्थांचे संबंधित सर्व पदाधिकारी, सोसायटी चेअरमन/व्हा.चेअरमन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक वृंद-विद्यार्थी, मान्यवर मंडळी, देशभक्त, महाराष्ट्र प्रेमी, समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.