तांबे वस्ती येथे गुरुवारपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री संत नामदेव महाराज व श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त तांबे वस्ती येथे हभप बन्सी महाराज तांबे यांचे कृपाशीर्वादाने, हभप गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड) यांच्या आशिर्वादाने व हभप गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर यांच्या प्रेरणेने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. १७ जुलै ते २४ जुलै या कालावधित अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

तांबे वस्ती येथील संत सावता महाराज मंदिर सभागृहात आयोजित या अखंड हरिनाम सप्ताहात सकाळी ४ ते ६ काकडा भजन, ८ ते ११ पारायण, दुपारी ४ ते ५ प्रवचन व रात्री ७ ते ९ हरिकीर्तन व तदनंतर जागर अशा दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह काळामध्ये विविध किर्तनकारांच्या किर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुरुवारी १७ जुलै हभप सुखदेव महाराज मुंगसे (बालाजी देडगाव), शुक्रवारी १८ जुलै हभप ज्ञानेश्वर महाराज पवने (जामखेड), शनिवारी १९ जुलै हभप सोमेश्वर महाराज गवळी (वैष्णव सेवा आश्रम, बऱ्हाणपूर), रविवारी २० जुलै हभप गुरुवर्य देविदास महाराज म्हस्के (श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, श्रीक्षेत्र नेवासा), सोमवारी २१ जुलै हभप गुरुवर्य महादेव महाराज राऊत (बीड), मंगळवारी २२ जुलै हभप गुरुवर्य प्रकाशनंदगिरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड संस्थान), बुधवारी २३ जुलै हभप गुरुवर्य रामगिरी महाराज येळीकर (येळेश्वर संस्थान श्रीक्षेत्र येळी) यांची कीर्तनसेवा होणार आहे. बुधवारी २३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता दिंडी मिरवणूक होईल. तसेच संत सावता महाराज चरित्रावर हभप सदाशिव महाराज पुंड (देडगाव) यांचे प्रवचन होईल. गुरुवारी २४ जुलै रोजी सकाळी ९ ते ११ हभप गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर (ज्ञानाई सेवा आश्रम, श्री क्षेत्र आळंदी देवाची) यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल. तरी या सोहळ्याचा बालाजी देडगाव व परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ देडगाव यांनी केले आहे.