बाबागिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने जानापूर येथील सप्ताहाची सांगता 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- जानापूर (वाघमारे वस्ती- पाचुंदा रोड) येथे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सदगुरू काटे महाराज, महंत सुनीलगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने व गुरुवर्य हभप अण्णा महाराज बोरुडे यांच्या अधिपत्याखाली श्री संत सेना महाराज पुण्यतिथी व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित त्रिदिनी हरिनाम सप्ताहाची हभप महंत बाबागिरीजी महाराज (काशी केदारेश्वर संस्थान नागलवाडी) यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्साहात सांगता झाली. यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सप्ताह काळामध्ये हभप विलास महाराज मदने (राहुरी), हभप सचिन महाराज पवार (श्री संत शिरोमणी सेना महाराज मंदिर, श्री क्षेत्र नेवासा) यांच्या किर्तनसेवा पार पडल्या. सोमवारी संत, महंत व भजनी मंडळाचे उपस्थित भव्य दिंडी मिरवणूक पार पडली. आज सकाळी महंत सुनीलगिरीजी महाराज (श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर), महंत बाबागिरीजी महाराज (काशी केदारेश्वर संस्थान नागलवाडी) यांच्या शुभहस्ते श्री संत सेना महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समस्त वाघमारे परिवार व समस्त ग्रामस्थ, समाज बांधव माका, पाचुंदा, निंबे नांदूर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पाचुंदा, निंबेनांदूर, देडगाव, माका आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.