नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या प्रमुखपदी देविदास महाराज म्हस्के 

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिर देवस्थानचे प्रमुख म्हणून वारकरी संप्रदायातील निस्सीम सेवेकरी ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांनी गुरुवर्य हभप भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते व संत महंतांच्या उपस्थितीत पदभार स्विकारला. देवस्थानचे मालक म्हणून नव्हे तर सेवक म्हणून सर्वांनी काम करावे, असे आवाहन भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले. वद्य एकादशीच्या मुहूर्तावर मंगळवारी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात पदभार प्रदान करण्याचा कार्यक्रम देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याच्या प्रसंगी गंगापूर येथील हभप रामभाऊ महाराज राऊत, आळंदी येथील हभप मीराबाई महाराज मिरीकर, श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरीजी महाराज, महंत गोपालानंदगिरीजी महाराज, आमदार शंकरराव गडाख, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज, मध्यमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी  ऋषिनाथजी महाराज, इमामपूर येथील जंगली आश्रमाचे महंत बाळकृष्ण महाराज, देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, बाळकृष्ण महाराज सुडके, बालसंन्याशी महंत विश्वनाथजी महाराज यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना भास्करगिरीजी महाराज म्हणाले, ब्रम्हलिन गुरुवर्य बन्सी बाबांनी केलेल्या कष्टातून हे देवस्थान उभे राहिले आहे, सेवा समाजाचे धर्म कार्य आहे. या ठिकाणी आजची झालेली निवड ही सर्व महाराज मंडळी, नेवासकर मंडळी, व सर्व राजकिय मंडळी यांच्या विचारातून झाली आहे. त्यामुळे देश सुरक्षित तर धर्म सुरक्षित मगच समाज सुरक्षित राहील.आपण माऊली सेवक आहोत, आपल्या हातून हानी होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे, विश्वस्त मंडळ हे मालक नाही तर माऊलींचे सेवक आहेत, या भावनेने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
आमदार शंकरराव गडाख म्हणाले की, मंदिर प्रमुख या पदाबाबत सर्व नेवासेकर यांनी स्वागत केले, फार दिवस हे पद मोकळे ठेवता येणार नव्हते. सर्व महाराज मंडळीच्या विचारातून हे पद देण्यात आले आहे. इथे विकासात्मक कामे केली, या गोष्टीवर समाधानी न रहाता आणखी निधी आणण्यासाठी मी प्रयत्न करेल, अशी ग्वाही आमदार गडाख यांनी दिली.