राजकीय पक्षांनी सामान्य कुटुंबातील उच्चशिक्षित तरुणांना उमेदवारी द्यावी 

राजकीय

जनशक्ती (वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले होते की, देशातील सुमारे एक लाख तरुणांनी आपल्या आवडीच्या राजकीय पक्षात प्रवेश करावा, त्यामुळे राजकारणात नवीन विचारधारेचा समावेश होईल. राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका घोषित होणार आहेत. प्रत्येक पक्षांची उमेदवारांसाठी चाचपणी चालू आहे. या निवडणुकात प्रत्येक राजकीय पक्षाने प्रत्येकाच्या वाटेला येणाऱ्या एकूण जागेच्या ५० टक्के जागा या सामान्य कुटुंबातील उच्चशिक्षित तरुणांना द्याव्यात, अशी मागणी नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील गणेश उर्फ आदिनाथ सुसे यांनी केली आहे. राज्यातील सामान्य तरुणांना अपेक्षा आहे की, आपणही सरकारमध्ये सामील होऊन सामान्य जनतेची सेवा करावी. तसेच सामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडावेत. परंतु प्रत्येक राजकीय पक्ष उमेदवार निवडताना त्याची पार्श्वभूमी पाहतात त्याच्या आर्थिक परिस्थिती व राजकीय पार्श्वभूमीचा विचार करतो. त्यामुळे सामान्य जनतेला नेहमीच या प्रक्रियेपासून दूर ठेवले जाते. सर्वसामान्यांचा फक्त कार्यकर्त्या व मतदानापुरता वापर केला जातो. त्यामुळे गणेश सुसे म्हणाले की, आमची सर्व राजकीय पक्षाकडे मागणी आहे की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षाने सामान्य परिवारातील जे उच्चशिक्षित तरुण विधानसभेत जाऊ इच्छितात, अशा उमेदवारांना उमेदवारी जाहीर करावी. सामान्य जनतेवर वारंवार तोच तोच उमेदवार पक्ष लादत असल्याने प्रत्येक पक्षाकडे पाहण्याची भूमिका जनतेची बदललेली आहे. त्यामुळेच आमच्या या मागणीकडे प्रत्येक राजकीय पक्षाने वेळेत सावध होऊन तसेच गांभीर्य ओळखून उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी गणेश उर्फ आदिनाथ सुसे यांनी केली आहे.