जनशक्ती (वृत्तसेवा)- मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे पुढील ५ दिवसांमध्ये माॅन्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्यात आज आणि उद्या काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले.हवामान विभागाने सांगितले आहे की, मान्सून पुढील ५ दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल होईल. तसेच माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील ५ दिवस मान्सून दक्षिण अरबी समुद्र,उर्वरित मालदीव आणि कोमोरीन भाग, लक्षद्वीपचा आणखी काही भाग, केरळ, आग्नेय आणि मध्य बंगालचा उपसागर तसेच ईशान्य भारतातील काही भाग व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. मान्सूनने काल म्हणजेच रविवारी श्रीलंका आणि बंगालच्या उपसागरात काही भागांमध्ये प्रगती केली होती. पण आज मान्सूनने याच भागात मुक्काम केला. मात्र, मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून माॅन्सूनची वाटचाल कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. केरळ, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात पावसाचा आणि उष्णतेच्या लाटेचाही इशारा दिला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आणि नगर तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि नांदेड तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावाती, नागपूर जिल्ह्यात काही ठिाकणी वादळी पावसाचा अंदाज दिला आहे.
